मुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपानं ३१ ऑक्टोबरचा मुहुर्त साधला असून संध्याकाळी पाच वाजता वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
भाजपनं महाराष्ट्रात अल्पमतातील सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. उद्या भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागेल हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाल्यावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ३१ ऑक्टोबरला घेण्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
शेलार आणि अन्य भाजपा नेत्यांनी आज वानखेडे स्टेडियमचा दौरा करुन आढावाही घेतला. हा सोहळा ऐतिहासिक व्हावा आणि सर्वसामान्यांना या सोहळ्याचे साक्षीदार होता यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही शेलार यांनी सांगितलं.
यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार होता. मात्र यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य कामांमध्ये व्यस्त असल्यानं ते मुंबईला येऊ शकले नसते. यामुळंच आता ३१ ऑक्टोबररोजी शपथविधी सोहळा घेण्याचं ठरलंय. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यावर निलोफर या वादळाचं सावट पसरलं आहे. अरबी समुद्रातील निलोफरमुळं किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.