गार्डला विसरून गाडी धावली!

चर्चगेट- डहाणू लोकलचा गार्ड पालघर स्टेशनवर चहा प्यायला उतरला असतानाच मोटरमनने ट्रेन सुरू केली आणि ही ट्रेन पालघर ते बोईसरदरम्यान गार्डच्या गैरहजेरीत धावली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 28, 2013, 04:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चर्चगेट- डहाणू लोकल ट्रेन सुरू होऊन काही दिवसही झाले नसतील, तर त्यात सकाळी एक गडबड झाली. मात्र ही गडबड तांत्रिक नसून मानवी होती. चर्चगेट- डहाणू लोकलचा गार्ड पालघर स्टेशनवर चहा प्यायला उतरला असतानाच मोटरमनने ट्रेन सुरू केली आणि ही ट्रेन पालघर ते बोईसरदरम्यान गार्डच्या गैरहजेरीत धावली.
गार्ड हा लोकल ट्रेनचा प्रमुख मानला जातो. तो शेवटच्या डब्यातून प्रवाशांची चढ उतार पाहात असतो. आणि त्यानुसार घंटी वाजवून मोटरमनला ट्रेन सुरू करण्याची सूचना देत असतो. सकाळी ५.२४ची चर्चगेटहून डहाणूला जाणारी ट्रेन पालघर स्टेशनवर थांबली. तेव्हा ट्रेनचा गार्ड स्टेशनवर चहा पिण्यासाठी कुणाच्याही नकळत उतरला. याची कल्पनाच नसलेल्या मोटरमनने गाडी सुरू केली.
उमरोळीनजीक आल्यावर मोटरमनच्या हा घोळ लक्षात आला. त्याने स्टेशन मास्तरला याबद्दल सांगितलं. स्टेशन मास्तरने गार्डशी संपर्क साधल्यावर गार्डने पालघर येथून रिक्षेने बोईसर स्टेशन गाठले. तोपर्यंत स्टेशन मास्तरांच्या सहाय्याने बोईसर स्टेशनला आणलेली लोकल बराच वेळ थांबून राहिली.
गार्डच्या सुचनेशिवाय मोटरमनने गाडी सुरू कशी काय केली? असा प्रश्न विचारला जात आहे. तसंच लोकल ज्या स्टेशनवरून सुटते त्या आणि शेवटी ज्या स्टेशनला पोहोचते त्या अशा दोनच स्टेशनवर उतरायची गार्डला नियमानुसार परवानगी असते. अशावेळी गार्ड पालघर स्टेशनला चहा पिण्यासाठी उतरलाच कसा, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे कुठलंही नुकसान झालं नसलं, तरी प्रवाशांच्या जीवाची हानी होऊ शकली असती. ही घटना गंभीर असून या घटनेची चौकशी होणार असल्याचं मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.