www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
कुख्यात गँगस्टर अबू सालेमवर तळोजा कारागृहात झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलेत. तुरूंग महाव्यस्थापक मीरा बोरवणकर या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
सालेमच्या करंगळीला गोळी चाटून गेल्यानं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्याची रवानगी पुन्हा तळोजा जेलमध्ये करण्यात आलीये. गँगस्टर संतोष शेट्टी टोळीचा गुंड देवेंद्र जगताप यानं सालेमवर गोळी झाडली. जगताप हा शाहीद आझमी यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटकेत आहे.
काही आठवड्यापूर्वी खंडणीच्या रकमेवरून सालेम आणि जगतापमध्ये बाचाबाची झाली होती. कुख्यात गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत काम करतानाही सालेम आणि जगतापमध्ये संबंध ताणले गेले होते. त्यानंतर सालेमनं स्वत:ची टोळी बनवली तर जगताप संतोष शेट्टी, विजय शेट्टी आणि भरत नेपाळीच्या टोळीत सामील झाला होता. त्यानंतर तो नेपाळी आणि शेट्टीसाठी काम करू लागला.
या दोघांच्या सांगण्यावरूनच जगतापनं वकील शाहीद आझमी यांची सुपारी घेतली होती. त्यांच्याच खुनाच्या आरोपाखाली जगताप सध्या अटकेत आहे. यापूर्वीही आर्थर रोड जेलमध्ये अबू सालेमवर हल्ला झाला होता. गँगस्टर मुस्तफा डोसानं त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सालेमला तळोज्याला हलवण्यात आलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.