हॉटेलच्या गच्चीवरही रंगणार पार्ट्या!

अनेक हॉटेल्सच्या गच्चीवर जेवणासह खानपान सेवा पुरवण्यास बंदी आहे. परंतु, आता ही बंदी उठवली जाणार आहे, तसेच महापालिकेच्या परवानगीने गच्चीवर खानपान सेवा पुरवता येणार आहे.

Updated: Dec 21, 2014, 08:17 PM IST
हॉटेलच्या गच्चीवरही रंगणार पार्ट्या! title=

मुंबई : अनेक हॉटेल्सच्या गच्चीवर जेवणासह खानपान सेवा पुरवण्यास बंदी आहे. परंतु, आता ही बंदी उठवली जाणार आहे, तसेच महापालिकेच्या परवानगीने गच्चीवर खानपान सेवा पुरवता येणार आहे.

शिजवलेले खाद्यपदार्थ गच्चीवर नेऊन तिथून याचे वाटप करण्यासंदर्भात महापालिकेने मार्गदर्शक धोरणच तयार केलं आहे, यापुढे हॉटेलच्या गच्चीवर जोरदार पार्ट्या रंगणार आहे.

मुंबईतील हॉटेलच्या गच्चीवर खाद्य सेवा पुरवण्याबाबत महापालिकेकडून परवानगी दिली जाणार असून, याबाबत मार्गदर्शक धोरण तयार केले आहे. हे धोरण सुधार समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. 

हॉटेलची इमारत एकाच मालकाची असल्यास त्या इमारतीच्या गच्चीवर खाद्य सेवा पुरवण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी तथा विभागीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केल्यानंतर ही परवानगी हॉटेल्सना दिली जाणार आहे. 

मात्र, ही परवानगी देताना हॉटेल असलेली संपूर्ण इमारत ही त्यांच्या मालकीची असल्यास किंवा रहिवाशी राहत असल्यास त्यांना उपद्रव होणार नाही, याची हमी घेतली जाणार आहे.

गच्चीवर बनवून आणलेले खाद्यपदार्थ इंडक्शन किंवा मायक्रोव्हेव्ह ओव्हनमध्ये गरम करण्याच्या बदल्यातच ही परवानगी मिळेल. परंतु गच्चीवर खाद्यपदार्थ बनवण्यास दिले जाणार नाहीत. याशिवाय फास्ट फुड स्टॉल्स, आईस्क्रीम पार्लर, पानबिडीचे स्टॉल्स आदी नसावे, झाडाचा पालापाचोळा पडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच गच्चीवर शौचालय नसावे, हात धुण्यासाठी व्यवस्था केल्यास ते पाणी सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे केला जावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. 

तसेच हॉटेलची इमारत ही पुरातन वास्तू यादीतील श्रेणी १, २ किंवा ३ मध्ये समाविष्ट असेल किंवा पुरातन वास्तू संकुलात येत असेल किंवा इमारतीच्या गच्चीवर दिवाबत्ती लावायची असल्यास त्यासाठी मुंबई पुरातन वास्तू जतन समितीचे पूर्वपरवानगी ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.