मुंबई : राज्यातील पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप पालकमंत्र्यांवर संपूर्ण जबाबदारी असेल, असा निर्णय काल मध्य़रात्री भाजपने घेतला. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
ज्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, तिथे इतर मंत्री काम करतील असेही ठरवण्यात आले आहे. शिवसेना-भाजप युतीबाबतच्या निर्णयानंतर शिवसेनेशी सहकार्याची अपेक्षा ठेवावी, असेही भाजप मंत्र्यांना सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रात्री ही बैठक बोलावली होती. भाजपचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तसंच या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश उपस्थित होते.
राज्यातील पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली. शिवाय राज्यातील विविध कामांचा आणि पक्ष रणनितीचा आढावाही यावेळी घेतला गेला. जिल्हा परिषद आणि महापालिकेची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय कामे करायची आहेत यावर जास्त फोकस करा. केंद्र आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. शिवसेनेसह, विरोधकांचा सामना करण्यासाठी अॅक्शन प्लान हवा, असे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.