आठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप

नशा करण्यासाठी तरूणाईकडून होणारा ड्रग्जचा वापर ही आतापर्यंतची डोकेदुखी होती. पण, आता केवळ कॉलेजमधील तरूणाईचं नाही, तर चक्क शाळा शिकणारे विद्यार्थीही नशेच्या विळख्यात अडकतायत. त्यांच्या दप्तरातच वह्या-पुस्तकांसोबत आता ड्रग्ज सापडू लागलंय.

Updated: Jul 16, 2014, 09:47 AM IST
आठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : नशा करण्यासाठी तरूणाईकडून होणारा ड्रग्जचा वापर ही आतापर्यंतची डोकेदुखी होती. पण, आता केवळ कॉलेजमधील तरूणाईचं नाही, तर चक्क शाळा शिकणारे विद्यार्थीही नशेच्या विळख्यात अडकतायत. त्यांच्या दप्तरातच वह्या-पुस्तकांसोबत आता ड्रग्ज सापडू लागलंय.

काळ बदलला... पण वाईट सवयी काही सुटल्या नाहीत... आजही नशेसाठी अंमली पदार्थांचा, ड्रग्जचा वापर करण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. उलट कालपर्यंत कॉलेज तरूणाईपर्यंत मर्यादित असलेलं व्यसनांचं हे लोण आता शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलंय. हल्ली शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तरात वह्या, पुस्तकं, पेन्सिल, पेन यासोबतच एखादी ड्रग्जची पुडी हाताला लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका... असंच घडलंय गोरेगावच्या एका कुटुंबासोबत... आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात पालकांना ड्रग्जची पुडी सापडली... इतकंच नाही तर आयड्रॉपही आढळला... 

आता आयड्रॉपचा आणि ड्रग्जचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर ड्रग्जचं सेवन केल्यानंतर डोळे लाल होतात. डोळे लाल का? असा प्रश्न घरातल्यांना पडायला नको म्हणून ही मुलं आयड्रॉप टाकतात, असं पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत सांगतात.  
अशा हजारो विद्यार्थ्यांचं बालपण नशेच्या व्यसनामुळं सध्या धोक्यात आहे. आधी व्यसनासाठी गुटखा, दारु, तंबाखू, सिगारेट, गांजा, चरस, ब्राउन शुगर, कोकीन अशा अंमली पदार्थांचा वापर व्हायचा... आता व्हाईटनर, कफ सिरप, बाम अशा पदार्थांनीही नशा करण्याचे प्रकार वाढलेत... अनेक जण तर पावाला बाम लावून आणि पेट्रोलमध्ये पाव बुडवून ते खातात... गेल्या काही वर्षात शालेय विद्यार्थ्यांमध्ये नशेचं प्रमाण झपाट्यानं वाढलंय. सरकारी हॉस्पिटल्समध्ये व्यसनमुक्तीसाठी जाणाऱ्या पेशंट्समध्ये अधिकतर कॉलेज तरुण आणि शाळकरी विद्यार्थी आहेत, अशी माहिती केईएम हॉस्पीटलच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिल्पा आढारकर यांनी दिलीय. 

2013 मध्ये लहान मुलांमध्ये केलेल्या सर्वेनुसार राज्यात...
- 71.50 टक्के मुलांना तंबाखू खाण्याचं व्यसन आहे. 
- 52 टक्के मुलांना दारु पिण्याचं व्यसन आहे
- कॅनाबिसचा वापर करणारे 26.50 टक्के
- अफूचा वापर करणारे 2.20 टक्के 
- हेरॉईन सेवन करणारे 3.50 टक्के
- गुंगीच्या औषधांचं सेवन ककरणारे 0.70 टक्के 
- नशेसाठी इंजक्शनचा वापर करणारे 23.50 टक्के विद्यार्थी आढळले.

आपला मुलगा व्यसनांच्या आहारी गेल्याचं समजल्यानंतर पालक चक्रावून जातात. मात्र, पालकांनी अजिबात पॅनिक न होता, संयमाची भूमिका घेऊन आपल्या मुलाला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत... वाईट संगतीतून मुलं व्यसनांच्या आहारी जातात.. त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर त्यांच्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे...  असा सल्ला केईएम हॉस्पिटलच्या डीन डॉ. शुभांगी पारकर यांनी पालकांना दिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.