www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ उभारणीमध्ये लाखोंचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.
अनेक वाद-विवादानंतर शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी बाळासाहेबांना अग्नि दिला गेला त्याच ठिकाणी हे स्मृतीस्थळ उभारण्यात येतंय. हेच उद्यान विकसित करण्याचं काम ‘निसर्ग उद्यान’ या संस्थेला दिलं गेलंय. या कामासाठी ‘निसर्ग उद्यान’नं महापालिकेला दिलेल्या बिलांमध्ये झाडांच्या किंमतीमध्ये ज्यादा पैसे उकळल्याचं निदर्शनास आलंय. ऐन निवणुकीच्या तोंडावर उघडकीस आलेल्या या घोटाळ्याला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चांगलंच उचलून धरलंय.
या संस्थेनं दिलेल्या झाडांची बाजारभावानुसार एकत्रित किंमत एक लाख तीन हजार रुपये होतेय. असं असताना संस्थेनं पालिकेकडे पाच लाख ८५ हजार ५९४ रुपयांचं बिल सादर केलंय. त्यामुळे केवळ झाडांच्या खरेदीतच पालिकेची चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं दिसून येतंय.
महत्त्वाचं म्हणजे, स्थायी समिती अध्यक्ष आणि दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या आदेशानुसार निसर्ग उद्यान संस्थेकडे हे काम सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांनी शेवाळे यांनाही टीकेचं लक्ष्य केलंय. या मुद्यावरुन मनसेनं शिवसेनेला टार्गेट केलंय... तर शेवाळे यांनी मात्र वर्तमानपत्रात आलेली बातमी पेड न्यूज असल्याचा आरोप केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.