शिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा

निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 4, 2014, 09:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे अरबी समुद्रात उभं राहणारं स्मारक हे जगातलं सर्वात उंच स्मारक असेल, असा दावा राज्य सरकारनं केलाय. या स्मारकाच्या संकल्पचित्रांचं सादरीकरण मंगळवारी सरकारनं पत्रकारांसमोर केलं.
मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची चर्चा २००८ पासून सुरू आहे. २००८ साली सरकारने हे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजूनही हे स्मारक विविध परवानग्यांच्या फेऱ्यात अडकले आहे. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने सरकार या स्मारकाबाबत गांभीर्याने काम करत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. समुद्रात उभारण्यात येणाऱ्या संकल्पचित्राचे सादरीकरण सरकारतर्फे करण्यात आले. 
राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किमी अंतरावर हे स्मारक असणार आहे.
- या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ १९० मीटर उंचीचा भव्य पुतळा
- छत्रपतींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती दर्शविणारे कलादालन,
- वेगवेगळ्या आकाराची प्रेक्षागृहे
- प्रदर्शनी दालन
- जगातील सर्वात मोठ्या आकाराचे समुद्र मत्स्यालय
- छत्रपतींच्या जीवनातील घटना दर्शविणारा लाईट अॅण्ड साऊंड शो आणि
- छत्रपतींच्या प्रमुख किल्ल्यांच्या प्रतिकृती असणार आहेत.
गुजरातमध्ये नरेंद्र मोदी वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारत आहेत. मात्र, छत्रपतींचे हे स्मारक जगातील सगळ्यात उंच स्मारक असेल असा दावा केला जातोय. समुद्रात १७.६७ हेक्टर जागा खडकाळ आणि उथळ खडकाच्या जागेवर हे स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र, या स्मारकासाठी अजून काही पर्यावरण परवानग्या घ्यायच्या शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष स्मारकाचे काम कधी सुरू होणार याबाबत ठोस उत्तर सरकारकडेही नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शिवप्रेमींना खूष करण्याचा प्रयत्न मात्र सरकारने सुरू केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.