काँग्रेसवर राणेंच्या दैनिकाचा 'प्रहार'

आपल्या पराभवाला काँग्रेस नेते जबाबदार नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं असलं तरी, राणेंच्या पराभवाला काँग्रेसचे नेतेच जबादार आहेत, असं 'प्रहार' या दैनिकाने म्हटलंय. 

Updated: Apr 16, 2015, 04:41 PM IST
काँग्रेसवर राणेंच्या दैनिकाचा 'प्रहार' title=

मुंबई : आपल्या पराभवाला काँग्रेस नेते जबाबदार नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं असलं तरी, राणेंच्या पराभवाला काँग्रेसचे नेतेच जबादार आहेत, असं 'प्रहार' या दैनिकाने म्हटलंय. 

"राणे लढले, काँग्रेस हरले"  असं म्हणत प्रहारने स्वपक्षीय नेत्यांचा समाचार घेतला आहे. ज्या वांद्रे पूर्व पोट निवडणुकीच्या पराभवाचं खापर काँग्रेस नेत्यांच्या माथी फोडण्यात आलं आहे.
 
राणेंसारखा आक्रमक नेता विधानसभेत पोहचू नये, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी खेळी खेळली आहे. काँग्रेसचे अनेक नेते चेहरा दाखवण्यासाठी सोबत होते. मात्र त्यांनी काळोखात अनेक उद्योग केले, असा दावा 'प्रहार'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
 
'पराभवाला काँग्रेसच जबाबदार' (प्रहारच्या अग्रलेखातील मजकूर)
नारायण राणे यांचा पराभव करणे, हे केवळ शिवसेना-भाजपाचेच काम नव्हते तर स्वपक्षातली अनेक मंडळी राणे विधानसभेपर्यंत पोहोचू नयेत, अशा कारस्थानात निश्चितपणे असली पाहिजेत. भाजपा-सेनेला हे वाटणे अगदी स्वाभाविक आहे की, राणे यांच्यासारखा आक्रमक आणि खंदा आमदार विधानसभेत समोर उभा राहिला की, सरकारची फटफजिती होणार आहे. त्यामुळे नारायण राणे निवडून येता कामा नयेत, हे सेना-भाजपाला वाटणे अगदी स्वाभाविक मानले पाहिजे. पण, काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना तीच धास्ती होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अनेक नेते चेहरा दाखवण्यापुरते समोर होते. काही दाखवण्यापुरतेही नव्हते. जे समोर होते ते शरीराने बरोबर होते आणि मनाने काही वेगळेच योजत होते. त्यामुळे दिसायला काँग्रेस पक्ष प्रचारफेरीच्या जीपमध्ये एकत्र? दिसला तरी व्यवहारात काम करताना किंवा काळोख पडल्यानंतर तो एक नव्हता आणि काळोख पडल्यानंतरही अनेकांनी अनेक उद्योग केले; पण नारायण राणे लढले आणि पक्ष हरला, अशी त्यामुळे स्थिती झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.