मुंबई : बाळासाहेब ठाकरे मोठ्या मनाचे होते, अडचणीच्या काळात त्यांनी शत्रूला गाठले नाही. बाळासाहेब वेळप्रसंगी विरोधकांनाही मोठ्या मनानं मदत करायचे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा जलाशयाचं 'हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलायश' असं नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना शाब्दिक चिमटे काढले.
मुंबईत जरा पाणी साचलं की टीका सुरू होते. दिल्लीही पावसाच्या पाण्यात बुडाली तर तिथेही चौकशी करणार का, तिथल्या नालेसफाईतही भ्रष्टाचार झाला होता का असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपला टोला लगावला.
मुंबई मनपा चांगलं काम करत असूनही पालिकेबद्दल कोणी चांगलं बोलत नाही अशी टीका उद्धव यांनी केली. तर मध्य वैतरणा जलाशयातून वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यासाठी सर्व ती मदत बीएमसीला केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.