www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे बजेटही सर्वाधिक मोठे असते. आज स्थायी समिती बैठकीत वर्ष २०१४-२०१५ साठी पालिकेचं बजेट मांडलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचे हे बजेट असल्यानं त्याला अधिक महत्त्व आहे.
यंदाचं बजेट ३२ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे असणार आहे. मागील वर्षी २७ हजार ५०० कोटींचे बजेट होते. म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत बजेटच्या रकमेत १८ टक्क्यांची वाढ होऊ शकते. रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधांबरोबरच विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही तरतूद असणार आहे. यंदा जकातीच्या माध्यमातून पालिकेला कमी उत्पन्न मिळालंय. तसंच एलबीटी लागू करण्याचा निर्णय झाल्यास उत्पन्नावर परिणाम होवू शकतो.
आज शिक्षण विभागाचेही बजेट सादर होणार असून यामध्ये सुगंधी दूध योजना बंद केली जाणार असल्याचे समजते. तसंच येत्या काही वर्षात ३०० इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळा सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. शालेय वस्तू देण्याएवजी विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे जमा करण्याचे योजना लागू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. आठवी ते दहावीच्या ११४ शाळाही शिक्षण विभाग सुरु करणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.