अमित जोशी, मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यावर आणि मध्यवर्ती निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भाजपाने पुन्हा निवडणूक तयारीसाठी कंबर कसली आहे.
6 एप्रिल या भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्ताने भाजपाने आमदारांना न जिंकलेल्या जागांवर लक्ष केंद्रित करायला सांगितले आहे. भाजपाच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात भाजपाने जंगी तयारीचा कार्यक्रम आमदारांपुढे ठेवला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, संघटनमंत्री व्ही सतीश, प्रदेशाध्यक्षसह भाजपाचे मंत्री, आमदार उपस्थित होते.
दरम्यान, पुढच्या तयारीला लागा... दिवस सध्या कसे आहेत ते तुम्हांला माहित आहे असे सांगत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील घडामोडींचे संकेतच यावेळी दिले. तर जोपर्यंत जनतेकरिता, स्वार्थ सोडून काम करू तोपर्यंत लाल दिव्याच्या गाड्या आहेत हे लक्षात ठेवा. जनता हुशार आहे एका दिवसात लाल दिव्याच्या गाडीतून सायकलवर आणेल. पारदर्शकता भाषणापुरतं नाही प्रत्यक्षात करून दाखवावं लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वास्तव आमदारांसमोर ठेवलं. नेत्यांनी स्वतःच्या प्रेमात राहू नये. जनतेने मोठं केलं म्हणून पक्ष आहे. पक्षाने मोठं केलं म्हणून आपण आहात हे लक्षात ठेवा, असंही मुख्यमंत्रीनी यावेळी म्हटलंय.
कसा असेल भाजपचा पुढचा निवडणूक कार्यक्रम...
- 6 एप्रिल भाजप स्थापना दिवस ते 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती भाजप आमदारांनी निवासी प्रवास दौरे करावे
- यामध्ये जिंकलेल्या तसंच न जिंकलेल्या विधानसभा क्षेत्रात जाऊन जनता, कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी आमदार, मंत्रीनी घ्याव्यात
- केंद्राच्या योजनांची माहिती द्यावी
- विशेषतः भीम अॅप कसे उपयुक्त आहे हे लोकांना सांगावं
- 14 एप्रिलला शहरातील मुख्य चौकात स्टॉल लावून भीम अॅपची माहिती द्यावी
- आमदारांनी, मंत्र्यांनी आपल्या मतदार संघासह इतर मतदार संघात जावं
थोडक्यात निवडणुका घेण्याची वेळ आलीच तर जनसंपर्क कायम ठेवण्याच्या दृष्टीने भाजपाने या कार्यक्रमाची आखणी केली आहे