मुंबई : एकीकडं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतले संबंध बिघडत असताना, भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक मात्र पुन्हा एकदा वाढू लागलीय. ही जवळीक शिवसेनेसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
एकदा काडीमोड झाल्यानंतर सत्तेच्या निमित्तानं भाजप-शिवसेनेनं जुळवून घेतलं खरं... पण त्यांच्या संसारात पुन्हा खटके उडू लागलेत. आधीच शिवसेनेला सरकारमध्ये कमी महत्त्वाची खाती दिलेली. त्यात शिवसेना मंत्र्यांना विशेष अधिकारही दिले नाहीत. त्यामुळं पक्षात असलेली अस्वस्थता आधी रामदास कदम आणि नंतर स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच 'षण्मुखानंद'मध्ये झालेल्या भाषणात बोलून दाखवली.
सरकारमध्ये असून शिवसेना विरोधी पक्षासारखी वागतेय. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विरोधी पक्षात असूनही भाजपशी जुळवून घेतेय... विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनं भाजप सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. आता येत्या १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला शरद पवारांच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. नेमक्या व्हॅलेटाइन डेच्या मुहूर्तावर... दुसरीकडं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गोंदियाला राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. राजकारणात कुणीही अस्पृश्य नसतो, अशा सूचक शब्दांत भाजपकडून त्याचं समर्थन केलं जातंय.
त्यातच आता शिवसेनेनं सरकारविरोधात विदर्भात शिवसंपर्क मोहीम आखलीय. परिणामी भाजप नेत्यांमध्ये शिवसेनेबद्दलची नाराजी वाढतेय.
जागा वाटपावरून शिवसेना-भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष नाईलाजाने एकत्र आले आहेत. मात्र सत्तेसाठी एकत्र येऊनही या दोन्ही पक्षांचं मन अजून काही जुळलेली नाहीत. कायम आक्रमक भाषा बोलणारी शिवसेना त्यामुळे सत्तेबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची वाढती जवळीक त्यांना भाजपाबरोबर सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा तर करत नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.