मुंबई बेस्ट बंद, कर्मचारी आंदोलनावर तोडगा निघणार

बेस्ट कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालीय. तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये बेस्ट भवनमध्ये बैठक सुरू झालीय. बेस्ट प्रशासनानं `मेस्मां`तर्गत कारवाईच्या घेतलेल्या निर्णयानंतर कर्मचारी संघटना नरमल्याचं चित्र आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 2, 2014, 03:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बेस्ट कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालीय. तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये बेस्ट भवनमध्ये बैठक सुरू झालीय. बेस्ट प्रशासनानं `मेस्मां`तर्गत कारवाईच्या घेतलेल्या निर्णयानंतर कर्मचारी संघटना नरमल्याचं चित्र आहे.
बेस्ट बसेसच्या संपाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आता न्यायालयात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी थोड्याच वेळात होणारेय. दरम्यान युनियनच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानुसार कॅनेडियन वेळापत्रक हे कामगारांसाठी जाचक आणि घातक असल्याचं कोर्टाला सांगितलं. त्याचबरोबर हे वेळापत्रक लागू करु नये अशी विनंती कोर्टाला केली.
तर बेस्टच्या वकिलांनी कॅनेडियन वेळापत्रक हे एक आदर्श वेळापत्रक असून त्यानं बेस्टचा फ़ायदा होईल असा युक्तिवाद केला. तर बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार यांच्या भांडणात नाहक प्रवाशांना त्रास होतोय, त्यामुळे दोघांनी बसून २-३ आठवडे विचार करुन आपला निर्णय घ्या अशी भूमिका ग्राहक पंचायतीच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडली. त्यानुसार बेस्ट प्रशासन, आणि बेस्ट कामगार युनियन यांनी तत्काळ बैठक घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करा आणि कोर्टासमोर सांगा असे निर्देश दिलेत.
बेस्ट कर्मचा-यांचा संप आज दुस-या दिवशीही सुरुचं आहे. त्यामुळे बेस्ट ने प्रवास करणा-या तब्बल 40 ते 45 लाख प्रवाशांचे आजही हाल होतायत.. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होतेय. प्रवाशांकडून टॅक्सी चालक दुप्पट भाडं आकारलं जातंय... मात्र सलग दुस-या दिवशी बेस्ट मुंबईच्या रस्त्यावर धावत नसल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल होतायत.
एकीकडे हटवादी युनियन, दुसरीकडे आडमुठं प्रशासन.. या दोघांच्या वादात मात्र मुंबईकर वेठीला धरला गेलाय.. त्यात टॅक्सीचालकांकडून होणारी दामदुप्पट वसूली यामुळे यामुळं मुंबईकराच्या त्रासात भरच पडतेय...एकूणच काय तर मुंबईकर त्रस्त, नेते प्रचारात व्यस्त आणि प्रशासन सुस्त अशीच काहीशी परिस्थिती मुंबईत निर्माण झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.