www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बेस्ट कर्मचा-यांचा संप आज दुस-या दिवशीही सुरुचं आहे. त्यामुळे बेस्ट ने प्रवास करणा-या तब्बल ४० ते ४५ लाख प्रवाशांचे आजही हाल होतायत. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होतेय.
प्रवाशांकडून टॅक्सी चालक दुप्पट भाडं आकारलं जातंय. दरम्यान बेस्ट कर्मचा-यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय. त्यामुळे आता संपकरी कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र सलग दुस-या दिवशी बेस्ट मुंबईच्या रस्त्यावर धावत नसल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल होतायत.
एकीकडे हटवादी युनियन, दुसरीकडे आडमुठं प्रशासन. या दोघांच्या वादात मात्र मुंबईकर वेठीला धरला गेलाय. त्यात टॅक्सीचालकांकडून होणारी दामदुप्पट वसूली यामुळे यामुळं मुंबईकराच्या त्रासात भरच पडतेय...एकूणच काय तर मुंबईकर त्रस्त, नेते प्रचारात व्यस्त आणि प्रशासन सुस्त अशीच काहीशी परिस्थिती मुंबईत निर्माण झालीय.
हाल इथले संपत नाहीत असं म्हणायची वेळ मुंबईकरांवर आलीय. कारण सलग दुस-या दिवशी बेस्ट कर्मचा-यांचा संप सुरु असल्याने मुंबईकरांचा खोळंबा झालाय. त्यातच ऑटो रिक्षामन्स युनियननं या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिल्यानं मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडलीय.
बेस्ट कर्मचा-यांचा संप दडपण्याचा प्रयत्न केल्यास रिक्षा बंद करण्याचा इशारा युनियनचे शशांक राव यांनी दिलाय. दुसरीकडे स्कूल बस असोसिएशननं मुंबईकरांना दिलासा दिलाय. स्कूल बस असोसिएशनकडून मुंबईत ५०० बसेस धावणार आहेत.. या बसेस प्रवाशांकडून १० रुपयांपर्यंत भाडं आकारणार आहेत. मुंबईकरांनी १० रुपयांहून जास्त भाडं देऊ नये असं आवाहन स्कूल बस असोसिएशनकडून करण्यात आलंय.
वांद्रे परिसरातही बेस्ट बस कर्मचा-यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतायत. ठिकठिकाणी रिक्षासाठी रांगा लागल्याचं चित्र मुंबईत दिसून येतंय. मुलुंडमध्येही बसअभावी सकाळच्या वेळी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडालीय. बंदचा फायदा घेऊन रिक्षाचालकांनीही अव्वाच्या सव्वा भाडे वसुली करतायत. मुलुंडमधल्या बेस्ट क्वॉर्टर्समधल्या कर्मचा-यांच्या घरांवर कारवाई करण्यासंदर्भातली पत्र लावण्यात आलीयत.
बेस्टच्या चालक, वाहकांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय. यासंदर्भात हायकोर्टानं काल बेस्ट कर्मचा-यांचा बंद बेकायदेशीर ठरवत त्यांना कामावर रुजू होण्याविषयी आदेश दिले होते. मात्र सलग दुस-या दिवशी बेस्ट कर्मचा-यांनी आपला बंद सुरूच ठेवलाय. त्याविरोधात बेस्ट कर्मचा-यांवर मेस्मांतर्गत कारवाई होणारेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.