www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या बॅंक खात्यात बॅलन्स नसेल तर नो टेन्शन! कारण बॅंक झीरो बॅलन्स असेल तरीही दंड आकारू शकत नाही. कारण तसे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
दरम्यान, ग्राहकांच्या बचत खात्यात किमान बॅलन्स नसल्यास त्याला दंड आकारण्याऐवजी त्याची एखादी सेवा खंडीत करता येऊ शकते आणि पुरेसा बॅलन्स आल्यानंतर ती सेवा पुन्हा प्रदान केली जाऊ शकते, अशी सूचनाही आरबीआयने केली आहे.
बचत खात्यात किमान बॅलन्स राखता आला नाही तर ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा दंड आकारू नये, असे महत्वपूर्ण निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे आता बॅंकाना चाप बसणार आहे. आरबीआयच्या या दणक्यामुळे झीरो बँलन्स ठेवणाऱ्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बॅंक बचत खात्यात झीरो बँलन्स असेल तर ग्राहकांना दंडाचा भुर्दंड बसतो. हे ओळखून आरबीआयने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय. ग्राहकांनी त्यांच्या खात्यात किमान बॅलन्स ठेवावा, अशी अट बँका घालत असल्या तरी हा बँलन्स नसल्यास बँकांनी त्यांच्यावर यापुढे दंडात्मक रक्कम आकारू नये, असे आरबीआयने आज स्पष्ट केलेय.
ग्राहक हा नेट बँकिंग, एटीएम यामाध्यमातून आर्थिक उलाढाल करत असतो. त्यात बँकांचेच हित दडले असून ग्राहकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने किमान बॅलन्ससाठी आकारण्यात येणाऱ्या दंडातून ग्राहकाला सूट मिळावी, असेही आरबीआयने स्पष्ट केलेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.