रिक्षा संप, राव राणे आमनेसामने

२१ तारखेपासून पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या मुद्द्यावर आता नितेश राणे आणि शरद राव आमने सामने उभे राहीलेत. हा संप मोडून काढू असा इशारा राणे यांनी दिलाय तर राव यांनी राणेंच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 17, 2013, 06:20 PM IST

www.24taas.com, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई,
२१ तारखेपासून पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या मुद्द्यावर आता नितेश राणे आणि शरद राव आमने सामने उभे राहीलेत. हा संप मोडून काढू असा इशारा राणे यांनी दिलाय तर राव यांनी राणेंच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय. त्यामुळे बंद आंदोलन झाल्यास राव विरुद्ध राणे संघर्ष अटळ मानला जातोय...
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांचा हा इशारा...या इशा-याच्या निमित्तानं रिक्षाचालक-मालक संघटनांनी पुकारलेल्या बंद आंदोलनाचं वातावरण आता तापू लागलाय. रिक्षाचालक-मालक कृती समितीनं २१ ऑगस्टपासून पुढचे तीन दिवस रिक्षा बंद आंदोलनाची हाक दिलीय. रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांवर निर्णय होत नसल्यानं कृती समितीचे अध्यक्ष शरद राव यांनी बंद आंदोलनाचं हत्यार उपसलंय...

१ मे पासूनची दरवाढ विनाविलंब करावी
रिक्षाचालकांना पब्लीक सर्वंटचा दर्जा द्यावा
रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं
रिक्षाचालकांना म्हाडाच्या वसाहतींमध्ये घरे द्यावीत

या कृती समितीच्या प्रमुख मागण्या आहेत...मात्र सणासुदीच्या दिवसात लोकांना या आंदोलनातून वेढीस धरलं जात आहे असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. स्वाभिमानच्या झेंड्याखाली राणेंचीही रिक्षा चालकांची संघटना आहे. आपली संघटना या बंद आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं सांगत हे आंदोलनच मोडून काढू असा दावा राणेंनी केलाय...
कामगार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेल्या शरद राव यांनी नितेश राणेंच्या दाव्याची खिल्ली उडवलीय...
रिक्षाचालकांच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनावर बंदी घालण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीनं उच्च न्यायालयात धाव घेतलीय. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १९ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, आणि बंद आंदोलन झालंच तर राव विरुद्ध राणे संघर्षही अटळ मानला जातोय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.