www.24taas.com, मुंबई
मुंबई पोलिसंच्या सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईकर ज्यांच्यावर विश्वास ठेऊन सुखाची झोप घेतात त्याच मुंबई पोलिसांची मात्र आता झोप उडालेली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला कार्यक्रम बंद करण्याची सूचना करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नेहरूनगर येथे हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री कुर्ला येथे एका गुन्हेगाराने पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला केल्याची तर गोवंडी येथे पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी प्रदीप वाणी याला पोलीस ठाण्यास बोलविण्याकरिता पोलीस शिपाई संतोष भोई हे गेले होते. यावेळी प्रदीपने वाद घालत धारदार शस्त्राने भोई यांच्या डाव्या गालावर गंभीर वार केला. या हल्ल्यात भोई यांच्या कानापासून हनुवटीपर्यंत गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर भाभा त्यानंतर शीव रुग्णालयात उपचार करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा न्यू मिल रोडवरील तानाजी चौकात ही घटना घडली.
धारदार शस्त्राचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कुर्ला पोलिसांनी प्रदीप वाणी याला अटक केली आहे. आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आज दुपारी गोवंडी येथील कमला रमन्ना नगरात काही इसमांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली.