मुंबई : मराठा समाजाच्या मोर्चा प्रकरणात शरद पवारांवर आशिष शेलार यांनी टीका केलीय. पवारांनी या प्रकरणात विनाकारण लुडबूड थांबवावी, अशी आगपाखड शेलार यांनी केली. आधीच्या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आल्याचं ते म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आली आहे, असे मराठा मोर्चावरुन सरकारचे कान टोचले. त्यानंतर आशिष शेलार यांनी पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करुन तीची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. प्रचंड संख्येने या मोर्चाला मराठा समाजातल्या नागरिकांनी उपस्थिती लावली आहे. मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, पदाधिकारी,नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, वकील अशा सर्वच स्तरातील लोकांनी मूकमोर्चा काढला.
उत्स्फूर्तपणे काढलेल्या या मोर्चात प्रचंड संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. लांबच लांब रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असूनही रेटारेटी नाही. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी नाही, कुणा राजकीय नेत्याचे भाषणबाजीचे प्रदर्शन न करता मोर्चा काढण्यात आला.