परदेशात कंपनीत नोकरी देतो सांगून तरुणाला बनवलं 'घरगडी'!

खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकरीसाठी परदेशी गेलेल्या तरुणाची फसवणूक झाल्याचा आणखीन एक प्रकार समोर आलाय. सध्या हा तरुण परदेशातून भारतात परतण्यात यशस्वी झालाय. मात्र, या प्रकारामुळे कामगारांना परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आलीय.  

Updated: Sep 26, 2015, 10:58 PM IST
परदेशात कंपनीत नोकरी देतो सांगून तरुणाला बनवलं 'घरगडी'!  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकरीसाठी परदेशी गेलेल्या तरुणाची फसवणूक झाल्याचा आणखीन एक प्रकार समोर आलाय. सध्या हा तरुण परदेशातून भारतात परतण्यात यशस्वी झालाय. मात्र, या प्रकारामुळे कामगारांना परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आलीय.  

अमित वाघमारे असं या २३ वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. नेरुळमधल्या 'गुडनेट' कंपनीच्या माध्यमातून सौदी अरेबियातील दमाम इथं कंपनीत नोकरी देतो, असं सांगून त्याला सौदीला नेण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात अमितला सौदीला राहणाऱ्या वलीद फेरियान नावाच्या इसमाच्या घरी 'घरगडी' बनवण्यात आलं. 

पासपोर्ट हातात नसल्यानं अमितनं नाईलाजानं घरगडी म्हणून इथं राबण्यास सुरुवात केली. मात्र, याचसोबत मालकाकडून अमितला मारहाण करुन त्याचा छळही सुरु झाला. 

संधी मिळाल्यानंतर अमितनं लागलीच आपल्या घरच्यांना या गोष्टीबाबत कळवलं. घरच्यांनी मदतीसाठी कंपनीकडे तात्काळ धाव घेतली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. 

कुठलीच मदत न मिळाल्यानं आणि त्रास असहाय्य झाल्यानं अमितनं सौदीतल्या समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा तिथल्या मच्छिमारांनी अमितचा जीव वाचवला... आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं... आणि पोलिसांच्या मदतीमुळे अमित भारतात आपल्या घरी परतण्यात यशस्वी झाला. 

आपला मुलगा सुखरूप परत आल्याचं पाहून अमितच्या घरच्यांना आनंद झालाय. मात्र फसवणूक झालेला अमित हा एकटाच तरुण परदेशात अडकलेला नाही... त्याच्यासारखेच अनेक तरुण मदतीसाठी वाट पाहत आहेत, अशा तरुणांना भारतात आणण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी मागणी अमितच्या कुटुंबीयांनी केलीय.

त्यामुळे, तुम्हालाही परदेशात नोकरी मिळवून देतो असं सांगून फसवणाऱ्या कंपन्यांपासून अगोदरच सावध राहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.