www.24taas.com, मुंबई
शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. य़ा बैठकीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलीये. त्यामुळं आदित्य ठाकरे आता पक्षात नवी जबाबदारी पार पाडण्याची चिन्ह आहेत.
उद्याच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे. उद्धव यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार सोपवण्यात येणार आहेत. पक्षात नेतेपदाच्या काही रिक्त जागा आहेत. त्यावरही नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून कळतेय.
उद्याच्या बैठकीला 180 पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. यात शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि युवा सेनेच्या पदाधिका-यांचा समावेश आहे.
काँग्रेसमध्ये राहुल तर सेनेत आदित्य.....
काँग्रेस आणि शिवसेनेत युवा पिढीकडे मोठी जबाबदारी सांभाळण्याची संकेत दोन्ही पक्षांनी दिले आहेत. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करून आगामी काळात पक्षाची धुरा तेच सांभाळणार याचे स्पष्ट संकेत जयपूरच्या काँग्रेस चिंतन शिबिरात पक्षाकडून देण्यात आले.
तर दुसरीक़डे शिवसेनेच्या उद्याच्या महत्वपूर्ण बैठकीत आदित्य ठाकरे यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं राजकारणात आता तरूणांचा राजकीय लढा पाहायला मिळणार आहे.