आता बारकोडसहित मिळणार डिजिटल रेशनकार्ड...

रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यासाठी आता राज्य शासनातर्फे लवकरच नवीन रेशनकार्ड वितरीत करण्यात येणार आहेत. या नवीन रेशनकार्डमुळे धारकांना आपला तपशील ऑनलाईनही उपलब्ध होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 22, 2013, 02:30 PM IST

www.24taas.com, मुंबई
रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यासाठी आता राज्य शासनातर्फे लवकरच नवीन रेशनकार्ड वितरीत करण्यात येणार आहेत. या नवीन रेशनकार्डमुळे धारकांना आपला तपशील ऑनलाईनही उपलब्ध होणार आहे.
आता या नव्या डिजिटल रेशनकार्डवर कुटुंबप्रमुखाचा फोटोही असेल. तसंच पॅनकार्डच्या आकाराच्या या रेशन कार्डाला बारकोड नंबर दिला जाईल, त्यामुळे बोगस रेशनकार्डचा सुळसुळाटही थांबू शकेल. राज्यात एकूण २.२० कोटी रेशनकार्डधारक आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात ६१ हजार ५४६ रेशनकार्डधारक असून, १४१ अधिकृत रेशन दुकानं आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकार्यारला रेशनकार्डधारकांची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आलेत. आतापर्यंत १ कोटी ९ लाख रेशनकार्डधारकांची माहिती घेण्यात आली आहे. लवकरच हे सर्व काम पूर्ण होणार आहे.

बाजूला बोगस रेशनकार्ड देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. या अंतर्गत वडाळ्याच्या शिधा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सध्या खातेनिहाय चौकशी सुरू आहे. या कार्यालयातून १४८८ बोगस रेशनकार्ड जारी झाली आहेत. असा गैरप्रकार आढळणाऱ्या प्रत्येक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.