ठाकरे-गडकरी भेट, युतीतील दुरावा दूर

माझा फोन शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचत नाही, असे म्हणणाऱ्या भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली. शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्व भूमीवर ठाकरे-गडकरी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे

Updated: Apr 21, 2012, 08:52 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

माझा फोन शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचत नाही, असे म्हणणाऱ्या भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली.  शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्व भूमीवर ठाकरे-गडकरी यांची  भेट महत्त्वाची मानली जात आहे. रात्री उशिरापर्यंत गडकरी आणि बाळासाहेब यांची चर्चा सुरू होती. यावेळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते.  या दीड तास चाललेल्या बैठकीचा तपशील मिळाला नाही.

 

 

 

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी  गडकरी यांना लक्ष करत भाजपमधील नव्या पिढीच्या नेत्यांवर तोफ डागली होती.  त्यानंतर मीडियाशी बोलताना गडकरी यांनी नाराजी व्यक्त करताना 'मातोश्रीवर केलेला फोन शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचत नाही',  म्हणाले होते. त्यानंतर नाशिक येथील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा हात सोडून मनसेला साथ दिली. त्याच्या मोबदल्यात भाजपचा उमेदवार उपमहापौर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील दुरावा  अधिकच वाढला होता. त्यामुळे ही भेट दुरावा दूर करण्यासाठी होती, अशी चर्चा आहे. मात्र, ही भेट राजकीय नव्हती; राजकारणावर चर्चा झाली नाही, असा दावा गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

 

 

 

शिवसेना-भाजप युतीमधील संबंध ताणले गेल्यानंतर भाजपचे  गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे , विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती. गडकरी जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा शिवसेनाप्रमुखांची भेट घेतील, असे मुनगंटीवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते. त्याचप्रमाणे गडकरी मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

 

 

 

दरम्यान,  शिवसेनाप्रमुखांची खूप दिवस भेट घेतली नव्हती. त्यांची  भेट झाल्यावर मनमोकळ्या गप्पा झाल्या. अनेक विषयांवर चर्चा झाली. बाळासाहेब हे युतीचे नेते आहेत, असे गडकरी यांनी नाराजीनंतर प्रथमच मीडियाला सांगितले.