www.24taas.com, मुंबई
शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारी यादी जाहीर न केल्यानं इच्छुक धास्तावले होते. विभागप्रमुखांकडे परस्पर ए.बी. फॉर्म देण्यात आले. उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. शिवसेना नेत्यांनी मात्र नाराजांची समजूत काढू असा दावा केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत संपल्यावर शिवसेनेलाही बंडखोरीचा काही प्रमाणात फटका बसला आहे. बंडाळी टाळण्यासाठी शिवसेनेनं यादी जाहीर न करता परस्पर विभागप्रमुखांमार्फत ए.बी फॉर्म दिले. मात्र अनेक ठिकाणी बंडोबांनी अधिकृत उमेदवाराला आव्हान देत निशाण फडकावलं आहे. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या अशा शिवाजी पार्क परिसरातल्या वॉर्ड १८५ मध्ये बंड झालं आहे. प्रवीण शेट्ये यांच्या उमेदवारीला विरोध करत संजय भरणकर आणि भरत राऊत यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. चंदनवाडीतल्या वॉर्ड क्रमांक २१८ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेनं संपत ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात विद्यार्थी सेनेचे राजू काळे आणि माजी उपविभागप्रमुख सुनील देसाई यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.
शिवसेना नेत्यांनी मात्र पक्षात कुठलीच बंडखोरी नसल्याचा दावा केला आहे. यादी जाहीर न करणं हा आमच्या रणनितीचा भाग होता असं पक्षानं स्पष्ट केलं आहे. काही ज्येष्ठ नगरसेवकांची जणांची समजूत काढण्यात शिवसेनेला यश आलं आहे. चार तारखेला अर्ज मागं घ्यायची शेवटची मुदत आहे. त्यानंतरच कुणाचं बंड टिकलं आणि कोण बंडोबा थंडाबा झाले हे उघड होईल. मात्र महापालिकेत अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेलाही अनेक ठिकाणी बंडाचा फटका बसला आहे.