सरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत

 सरकारच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

Updated: Jan 26, 2016, 08:07 PM IST
सरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत title=

नागपूर :  सरकारच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्यासाठी नागपुरातील १०० कुटुंब सरसावली आहेत. ऋणाधार संस्थेच्या ‘अंकुर’ प्रकल्पाची आज मोहन भागवत यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी हे आवाहन केले.

शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमुख कारण त्यांच्यामधील आत्मविश्वासाची कमतरता होय. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांची समस्या लवकर सुटणारी नाही. म्हणून सरकारवर अवलंबून न राहता समाजाने आपले दायित्व स्वीकारत शेतकऱ्यांसाठी पुढे यावे, असे ते म्हणालेत.

ऋणाधार संस्थेच्या ‘अंकुर’ प्रकल्पाअंतर्गत नागपुरातील १०० कुटुंब शेतकऱ्यांच्या १०० कुटुंबांना दर महिना ४ हजार रुपये वर्षभर देणार आहेत. त्यामुळे  एका शेतकरी कुटुंबाला वर्षाची ४८ हजार रुपयांची मदत होणार  आहे. भागवत यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबाला पहिल्या मदतीचा चेक देण्यात आला. आता दर महिन्याला ही मदत शेतकरी कुटुंबाच्या जन-धन खात्यात सरळ जमा केली जाणार आहे.

विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ आणि आधार देण्यासाठी ‘ऋणाधार’ संघटना पुढे सरसावलेय. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी संस्थेतर्फै ‘अंकुश’ प्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येईल. नागपुरात मुलांसाठी होस्टेल बांधण्यात येतील. तर शेतकऱ्यांच्या मुलीसांठी त्यांना पूरक असा व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.