चंद्रपूर : उमरेड करांडला अभयारण्यातला 'जय' वाघ बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच आता त्याचा बछडा असलेला श्रीनिवासनही बेपत्ता झालाय.
श्रीनिवासन नागभीड जंगलात राहायचा. १७ एप्रिलपासून त्याच्या कॉलर आयडीपासून मिळणारे सिग्नल एकाच ठिकाणाहून येत असल्यामुळे १९ एप्रिलला त्याचा शोध घेण्यात आला. श्रीनिवासनचा कॉलर आयडी जंगलात तुटलेल्या अवस्थेत मिळालाय. मागच्या वर्षी श्रीनिवासनच्या हालचाली टिपण्यासाठी त्याला कॉलर आयडी लावण्यात आला होता. पण आता तो तुटलेल्या अवस्थेत मिळालाय. त्यामुळे या वाघाचं काय झालं, याची चिंता वाढलीय.
उल्लेखनीय म्हणजे, वाघांना लावलेला कॉलर आयडी अतिशय शास्त्रीय पद्धतीने लावला जातो... मग तो निघाला कसा? असा प्रश्न उपस्थित होतोय.
त्यामुळे, त्याची शिकार झाली असावी अशी शंका वन्य जीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या पवनी जंगलात श्रीनिवासनचा जन्म झाला होता.