ठाणे : अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवलीय. बदलापूरमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालंय. तर अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तास्थापनेपासून तीन जागा दूर आहे. पण अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापना करणं शिवसेनेसाठी सहज शक्य होणार आहे.
अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेनं सत्ता मिळवलीय. या दोन्ही ठिकाणी शिवसेना आधी सत्तेत होती. मात्र बदलापूरमध्ये वामन म्हात्रे यांच्या नगराध्यक्षपदावरून झालेल्या वादातून शिवसेना भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी इथे एकमेकांविरोधात निवडणुका लढल्या.
निवडणुकीत आधीपासूनच शिवसेनेचं पारडं जड दिसत होतं. अखेर बदलापूरमध्ये ४७ पैकी २४ जागा शिवसेनेनं पटकावल्या आणि बहुमताला गवसणी घालत एक हाती सत्ता मिळवलीय. या निवडणुकीत भाजपला २०, राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या तर १ अपक्ष निवडून आलाय. मनसे या निवडणुकीत आपलं खातंही उघडू शकला नाहीये. विशेष म्हणजे किसन कथोरे यांच्यासारखा प्रबळ आमदार भाजपकडे होता तरीही इथे शिवसेनेनं बाजी मारली.
तर अंबरनाथममध्ये शिवसेनेनंही पुन्हा एकदा आपली जागा दाखवून दिलीय. २०१० च्या तुलनेत शिवसेनेच्या तब्बल १० जागा वाढल्या आहेत. यावेळी शिवसेनेनं तब्बल २६ जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष होण्याचा पराक्रम केलाय. शिवसेना आता इथे ४ अपक्ष आणि बंडखोरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान भाजपलाही अंबरनाथमध्ये गेल्यावेळेपेक्षा तब्बल ९ जागा जास्त मिळाल्या. भाजपला १० मिळूनही विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे..
अंबरनाथ बदलापूर इथे लागलेल्या या निकालांनी शिवसेनेची या विभागातली ताकद दाखवून दिलीय. ब-याच मोठ्या कालावधीनंतर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये एका पक्षाची सत्ता येणार आहे. त्यामुळे आता तरी विकासकामांना गती मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलीय.
अंबरनाथ नगरपालिकेत सव्वीस जागांवर निवडणूक आलेली शिवेसेना बहुमतापासून फक्त तीन जागा दूर आहे. त्यामुळे बंडखोरांच्या मदतीनं शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. भाजपला दूर ठेवण्याची रणनिती शिवसेनेनं स्विकारलीय.
अंबरनाथ तसंच कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अंबरनाथमध्ये सर्वाधिक जागा मिळवलेल्या शिवसेनेला निर्विवाद बहुमत गाठायला अवघ्या तीन जागा कमी पडल्या. तर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. या विजयानंतर आपल्या नेत्याचा विजय कार्यकर्त्यांनी जोषात साजरा केला. गुलाल उधळत, मिठाई वाटत आणि फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली. ५७ जागांपैकी तब्बल २६ जागा शिवसेनेनं जिंकल्या आहेत. भाजपला इथे १० जागा मिळाल्या. तर काँग्रेसला ८ आणि राष्ट्रवादीला ५ जागा जिंकता आल्या. मनसेला अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलंय. याआधी अंबरनाथमध्ये शिवसेना आणि मनसे युती पॅटर्नची सत्ता होती.
आता शिवसेना २६ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष झालाय. शिवसेना बहुमतापासून ३ जागा दूर आहे. मात्र सत्तेपासून भाजपला दूर राखणार असल्याचा निर्धार अंबरनाथमधल्या शिवसेना नेत्यांनी केलाय. बंडखोरांना हाताशी धरून ही शिवसेना सत्ता स्थापन करेल, असं शिवसेना नेत्यांनी जाहीर केलंय. यावेळी भाजपला ९ जागांचा फायदा होत १० जागा मिळल्या आहेत. मनसेला यावेळी अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलंय. काँग्रेसनेही ५ जागा जास्त पटकावत एकूण ८ जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादीला ५ जागांवर समाधान मानावं लागलंय. रिपाइंला यावेळी खातंही खोलता आलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.