परिस्थिती बदला, अन्यथा उद्रेक - पवार

'भारत माता की जय, असे म्हणणार नसेल, तर त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही,' या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला, तसेच केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

Updated: Apr 4, 2016, 01:33 PM IST
परिस्थिती बदला, अन्यथा उद्रेक - पवार title=

पुणे : 'भारत माता की जय, असे म्हणणार नसेल, तर त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही,' या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला, तसेच केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री जाती-धर्माच्या जनतेचा प्रमुख - पवार

शरद पवार पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'मुख्यमंत्री हा एखाद्या पक्षाचा असला, तरी तो राज्यातील सर्व जाती-धर्माच्या जनतेचा प्रमुख असतो. त्यामुळे त्यांनी असे बोलणे योग्य नाही, देशात आणि राज्यात अजून काही काळ अशीच परिस्थिती राहिली, तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही', असा इशाराही यावेळी शरद पवारांनी दिला.

लोकांना बदलाची अपेक्षा होती...

पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले, 'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु एका विशिष्ट समाजाला उद्‌ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही लोकशाही नाही. देशापुढे अनेक प्रश्‍न आहेत. लोकांना बदलाची अपेक्षा होती, परंतु देशात आम्हाला जे हवे ते करू, ही प्रवृत्ती वाढत चालली आहे'.

शिवाजी महाराज मुस्लिमद्वेष्टे नव्हते- शरद पवार

शिवाजी महाराज मुस्लिमद्वेष्टे नव्हते. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत मुस्लिमांचाही तेवढाच हात होता. मात्र भाजपप्रणित राज्यात शिवाजी महाराज हे मुस्लिमद्वेष्टे असल्याचे विचार पसरवले जात आहेत. प्रशासनातही आपल्याच विचारसरणीच्या लोकांना पुढे आणले जात आहे. त्यामागे वेगळी ताकद व विचारसरणी काम करीत आहे. त्याला जास्त महत्त्व दिले जाते. पंतप्रधान जेव्हा 'काँग्रेसमुक्त भारत‘ असे सांगतात त्या वेळी ते फॅसिस्ट दृष्टिकोन दाखवतात. हे असेच सुरू राहिल्यास ते लोकशाहीस घातक असून, त्यातून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी शरद पवारांनी दिला.

सरकारला दुष्काळी भागाबद्दल आस्था नाही - पवार

सरकारला दुष्काळी भागाबद्दल आस्था नाही. राज्यात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. यापूर्वीही राज्यात अशी परिस्थिती अनेकदा आली, पण, सरकारने खंबीरपणे ती हाताळली होती, असे सांगून पवार म्हणाले, 'सरकारने दुष्काळी जनतेच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहण्याची गरज आहे. दुष्काळाचे संकट एका पक्षाचे नाही. आम्हाला त्याचे राजकारण करावयाचे नाही. सर्वांनी एकत्र येऊन दुष्काळग्रस्तांच्या मागे उभे राहू.', असं यावेळी शरद पवार यांनी सांगितंल.