अण्णा हजारेंवर शरद पवार मानहानीचा दावा करणार?

 सहकारी कारखाने कवडीमोल भावानं विकून सरकारी तिजोरीचं 25 हजार कोटीचं नुकसान केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 4, 2017, 09:58 PM IST
अण्णा हजारेंवर शरद पवार मानहानीचा दावा करणार? title=

ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अण्णा हजारे यांच्यावर मानहानीचा दावा करण्याच्या मनस्थितीत असल्याचं म्हटलं आहे. सहकारी कारखाने कवडीमोल भावानं विकून सरकारी तिजोरीचं 25 हजार कोटीचं नुकसान केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

साखर कारखान्यांप्रकरणी अण्णा हजारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने डबघाईला आणत त्यांची कवडीमोल भावाने विक्री केली. 

तसेच सरकारी तिजोरीतील तब्बल 25 हजार कोटी रुपयांचं नुकसान करत राज्यावरील कर्जाचा बोजा एक लाख कोटी रुपयांहून वाढवला, असं सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

याचिकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांना थेट प्रतिवादी करण्यात आलं आहे. या नेत्यांनी कटकारस्थानाने हा संपूर्ण घोटाळा केला, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

अण्णा हजारेंनी एकेकाळी शिवसेना मंत्र्यांना जेरीस आणलं होतं. महाराष्ट्रात तो संघर्ष बराच गाजला. पण आता महाराष्ट्राला शरद पवार विरुद्ध अण्णा हजारे हा वाद बघायला मिळू शकतो. अण्णा हजारे आणि राजू शेट्टींनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या शुक्रवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.