नवी मुंबई : पक्षाने एकाच व्यक्तीला अनेक पद दिल्याने नाराज शिवसेनेच्या २० नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापती पद निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. त्यामुळे या राजीनामा नाट्यालाची जोरदार चर्चा आहे.
शिवसेनेचे नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना सभापती पद देण्यावरून अनेक नगरसेवक नाराज आहेत. एकाच व्यक्तीला अनेक पद देण्यावरून ही नाराजी आहे. इतरांनाही संधी मिळावी, अशी नगरसेवकांची मागणी आहे.विजय चौगुले यांनी पक्ष वाढीसाठी एकही काम केले नाही. नाराज नगरसेवकांनी उघडपणे आपली भूमिका मांडली.
मे महिन्यात पहिल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आहे. गेल्या स्थायी समितीमध्ये शिवसेनेला काँग्रेसची साथ मिळाल्यामुळे शिवसेनेकडे स्थायी समिती सभापती पद मिळाले होते.
स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस- ८ , शिवसेना - ६ , काँग्रेस - १, भाजप - १ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या नाराजीमुळे शिवसेनेला पुन्हा हे पद मिळणार नाही, अशी पालिका वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व दुसरे नाव जाहीर करणार का, याची चर्चा आहे.