माळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट

पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.

Updated: Aug 5, 2014, 12:08 PM IST
माळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट title=

पुणे : पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. 30 जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर अजूनही ढिगाऱ्याखालची प्रेतं आणि इतर वस्तू बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.

वेळीच प्रशासनानं दखल घेतली असती, तर ही जीवितहानी टाळता आली असती, असा खुलासा झालाय. अमेरिकेच्या अंतराळ यंत्रणा ‘नासा’नं या दुर्घटनेच्या अगोदरच्याच दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी या घटनेसंबंधी सूचना दिली होती.

नॅशनल एरोनॉटिक्स अँन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)नं आपल्या अधिकृत वेबसाईटवर 29 जुलै रोजी सायंकाळी या भागात भूस्खलन होण्याचा धोका उघड करत अलर्ट दिला होता. भीमाशंकरच्या डोंगराळ भागात ‘पर्पल कोड’मध्ये हा अलर्ट दिला गेला होता. ‘पर्पल कोड’ तेव्हा दिला जातो जेव्हा भूस्खनलन होण्याचा धोका असलेल्या भागात 175 मिमीहून अधिक पावसाची नोंद होते.  

या भागामध्ये माळीण गाव परिसराचाही समावेश होता. या भागात गेल्या आठवड्यात नासानं 600 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद केलीय. यामध्ये, अधिक पाऊस 29 आणि 30 जुलै दरम्यान झाल्याचं या नोंदीवरून दिसतंय. त्यानंतर नासानं हा अलर्ट दिला होता.  

29 जुलै रोजी सायंकाळा 6 च्या सुमारास ‘नासा’नं भीमाशंकरच्या भागात हायअलर्ट जारी केला होता. नासाचा हा अलर्ट उत्तर-पश्चिम घाट आणि गुजरातच्या काही भागांमध्य भूस्खलन होण्याची शक्यता व्यक्त करतोय. परंतु, भारतात मात्र या अलर्टवर लक्ष दिलं गेलं नाही.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.