माळीण, पुणे : एक अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथं ढिगा-याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पण एनडीआरएफ जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं, ते पाहून काळजाला चटका लागला.
हे साहित्य होतं, एका लग्नाच्या खरेदीचं. लग्नाच्या बस्त्याचं. दुपारी दीड वाजताच्या सुमारास एनडीआरएफच्या जवानांना गाळाखाली गाडल्या गेलेल्या एका घरात लग्नाच्या बस्त्याचं हे सामान आढळलं. त्यात दोन साडींचे गठ्ठे, एक टॉवेलांचा गठ्ठा आणि एका टोपींच्या गठ्ठ्याचा समावेश होता.
हे सगळं साहित्य एका पोत्यात बांधून ते शासन दरबारी जमा करण्यात आलं. सर्वांच्याच हृदयाला वेदना देणारं हे दृश्य कुणालाच पाहवत नव्हतं. कारण माळीणमधल्या ज्या घरात लग्नाचं आनंदी वातावरण होतं, त्या घराचं नामोनिशाणच मिटलं होतं.
या घरात सुखी संसाराची स्वप्नं कुणी रंगवत असेल. पण त्या स्वप्नांची चिखलमाती झाली होती. हे घर तर मातीमोल झालंच, या घराशी ज्यांचे नातेसंबंध जुळणार होते, त्या घरावर देखील माळीणच्या दुर्घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.