नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागपूर विमानतळावर आगमन झालं खरं मात्र त्यांच्यासोतच पावसाचंही जोरदार आगमन झालं. त्यामुळं मोदी नागपूर विमानतळावर थांबून आहेत. एटीसीनं त्यांच्या हेलिकॉप्टरला उडण्याची परवानगी नाकारली आहे.
नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या मौदाला ते रस्तेमार्गानंच जाण्याची शक्यता आहे. मौदाला सुपर थर्मल पावर फेज - एकचे उदघाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, पाऊस थांबल्यानंतर मोदी नियोजित ठिकाणी पोहोचलेत.
तत्पूर्वी नागपूर विमानतळावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. सोलापूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अपमान झाल्यानं मोदींच्या आजच्या विदर्भ दौ-यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकलाय. तर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊतांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसनंही पाठिंबा दर्शवलाय.
नरेंद्र मोदी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून वाद सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरात प्रगत की महाराष्ट्र यावरुन मोदी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद झाला होता. मुख्यमंत्र्यांनी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हानही दिले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी मोदींची सदिच्छा भेट घेतली पण मुख्यमंत्र्यांनी मात्र अजून पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली नाही याकडेही लक्ष वेधण्यात येतयं.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान वादात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केलीय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधत कार्यक्रम घेण्याची परंपरा होती ती पाळली गेली पाहिजे असं पाटील यांनी म्हटलयं.
पंतप्रधानांच्या दौ-यावर बहिष्कार घालणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विदर्भ विरोधी असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय तर मुख्यमंत्री पराभूत मानसिकतेत असल्यामुळेच त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलीय. तर मुख्यमंत्र्यांचे थोडेच दिवस शिल्लक असल्यामुळं त्यांच्या गैरहजेरीनं फरक पडत नसल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.