राज लेक्चर विसरले, आता फक्त प्रेम ओतू जातंय...

मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीत एक जागा मिळाली. सुरूवातीला या पूर्वी झालेल्या विधानसभेत, मनसेचे अकरा आमदार निवडून आले होते.

Updated: Jan 12, 2016, 06:01 PM IST
राज लेक्चर विसरले, आता फक्त प्रेम ओतू जातंय... title=

पुणे : मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीत एक जागा मिळाली. सुरूवातीला या पूर्वी झालेल्या विधानसभेत, मनसेचे अकरा आमदार निवडून आले होते.

पक्षाचे कार्यकर्ते यामुळे निश्चितच धास्तावले आणि पक्ष सोडण्याचं प्रमाण वाढलं, हे मनसेचं नाही तर प्रत्येक पराभूत पक्षाच्या वाटेला काळानुसार येत असतं.

मात्र आपल्या मावळ्यांना पक्ष न सोडण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. हे दिवसही जातील असंच त्यांचं म्हणणं असावं.

'प्रत्येक राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात सारखेच असून, कधी कोण जात्यात, तर कोण सुपात असते, असा सूचक संदेश देऊन थोडा संयम ठेवलात, तर आगामी काळात आपल्या पक्षाचे भविष्य बदलेल,' अशी आर्जवी साद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांना घातली. 

निवडणुका येतील आणि जातील; पण नागरिकांसाठी केलेले कामच तुमची प्रगती घडवेल, असे सांगून पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करणाऱ्यांनाही त्यांनी चुचकारले.

शहरातील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांची एकत्रित बैठक ठाकरे यांनी सोमवारी घेतली. नेहमी आक्रमक शैलीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणाऱ्या ठाकरे यांनी या वेळी समुपदेशनाच्या स्वरूपात सर्व पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

पक्षाच्या शहरातील सद्यस्थितीबद्दल कोणालाही जबाबदार न धरता, यापुढे अधिक नेटाने काम करीत राहण्याचा सल्ला त्यांनी सर्वांना दिला. 

जाहीर भाषण, सभा-समारंभातून विरोधी पक्षांवर घणाघाती टीका करणाऱ्या ठाकरे यांनी सोमवारी चक्क त्याच पक्षांची उदाहरणे देत, संयम ठेवण्याचे फायदे कार्यकर्त्यांपुढे मांडले. 

एका-एका वॉर्डातून, प्रभागातून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मर्यादित जणांनाच स्थान देता येणार आहे; पण पदाधिकारी म्हणजे सर्वस्व नाही. तर, कार्यकर्त्यांच्या संघटनावरच पक्ष मोठा होतो, असे पटवून देताना, नाराजीतून कोणीही पक्ष सोडू नका, असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले.