नवा वाद: कोल्हापूरला तुम्ही अंबामातेचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं?

कोल्हापूर मंदिरातल्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेचा वाद संपतो न संपतो तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी अंबामाता की महालक्ष्मी, असा वाद आता पुढे येतोय...

Updated: Aug 13, 2015, 10:40 PM IST
नवा वाद: कोल्हापूरला तुम्ही अंबामातेचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं? title=

प्रताप नाईक, झी मिडीया, कोल्हापूर: कोल्हापूर मंदिरातल्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेचा वाद संपतो न संपतो तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी अंबामाता की महालक्ष्मी, असा वाद आता पुढे येतोय...

अनेक भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेली ही करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी... अर्थात मूळची अंबामाता... महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक... ऐतिहासिक संदर्भानुसार मंदिर परिसरातल्या ११ व्या शतकातल्या शिलालेखावर अंबाबाईच्या मूर्तीवर तीन वेटोळं घातलेला नाग असल्याचा उल्लेख आहे. १८९४ मध्ये ब्रिटीश छायाचित्रकारानं काढलेल्या छायाचित्रातही मूर्तीवर नाग असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. याआधी १९५५ मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला, तेव्हाही नाग घडवण्यात आला होता. मग पुरातत्व खात्यानं अलिकडेच मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करताना नाग का मढवला नाही, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय.

मात्र आम्ही कधीच मूर्तीवर नाग पाहिला नाही, असा अजब दावा श्री देवीच्या पुजाऱ्यांनी केलाय... पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं देखील याबाबत मौन बाळगलंय. मूळ शैवपीठाच्या अंबामातेचं स्वरूप बदलून तिला विष्णूपत्नी महालक्ष्मीच्या रूपात दाखवण्याचा घाट घातला जातोय का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. 

मात्र सध्याच्या मूर्तीवर नागच नसल्यानं तो मढवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा पुरातत्व खात्यानं केलाय.

मग आता प्रश्न उरतो तो हा की, ही देवी अंबामाता आहे की महालक्ष्मी? जर ही अंबामाता आहे तर १९८१मध्ये तिरूपती देवस्थानाकडून विष्णूपत्नी म्हणून तिच्यासाठी साडी आणण्याची प्रथा का सुरू झाली? आणि जर ती महालक्ष्मी आहे तर तिच्या शिरावर नाग नाही, म्हणून आक्षेप घेण्याचं कारण काय? ऐतिहासिक संदर्भांमध्ये मूर्तीच्या भालस्थानी नाग असल्याचा उल्लेख आहे, तर मग तिची पूजाअर्चा करणाऱ्या पूजकांना ही बाब कशी दिसली नाही? या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत तोवर हा वाद मिटणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.