योग आणि धर्माचं राजकारण नको - मुस्लिम बांधव

योग करणे मुस्लिम सामाजाच्या विरोधात असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच नागपुरात मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या महिला आणि पुरूषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Updated: Jun 18, 2015, 07:12 PM IST
योग आणि धर्माचं राजकारण नको - मुस्लिम बांधव title=

नागपूर : योग करणे मुस्लिम सामाजाच्या विरोधात असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच नागपुरात मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या महिला आणि पुरूषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

नागपूरातील व्यावसायिक असलेल्या रियाझ खान यांच्या डाव्या हाताला अपघातात जखम झाली होती. त्यानंतर त्यांच्या हातावर शस्त्रक्रियाही झाली, मात्र त्यांचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. अखेरीस त्यांनी योगा करायला सुरूवात केली आणि त्यांचा हात पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर तर त्यांनी योगप्रसाराचा विडाच उचलला. 

योगामध्ये अद्भूत शक्ती असून, योग करणे इस्लामविरोधी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. योग करणारे रियाझ खान हे एकटेच मुस्लिम व्यक्ती नसून, त्यांच्यासारखे अनेक मुस्लिमबांधव योगाला प्राधान्य देत आहेत. आपल्या धर्मगुरूंनी योग करण्यास मान्यता दिल्याचं रियाझ खान यांचं म्हणणं आहे. 

फक्त पुरूषच नाही तर मुस्लिम सामाजातील महिला देखील योग करत असून, 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या योग कार्यक्रमातही सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. योगासारख्या कार्यक्रमावर उगाचच राजकारण केलं जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या योग दिन कार्यक्रमात सुमारे 50 मुस्लिम राष्ट्र सहभागी होणार आहेत. 
 
योग, धर्म आणि राजकारण याची सरमिसळ करू नये अशी अपेक्षा मुस्लिम समाजातील सर्व सामान्यांनी जरी व्यक्त केली असली तरी राजकारणी याला किती साद देतात ते महत्त्वाचे आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.