पुणे : मनसे सोडून भाजपच्या दारावर आलेल्या रवींद्र धंगेकरांना काँग्रेसचा हात धरावा लागलाय. त्यामुळं, पुणे भाजप मध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. धंगेकर नकोत म्ह्णून गिरीश बापट यांनी थेट आपलं मंत्रिपद पणाला लावलं. धंगेकर प्रकरणामुळं भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना धडकी भरली आहे. तर, बापट यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप होतोय.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजप मध्ये जोरदार इनकमिंग सुरु झालं होतं. काँग्रेस , राष्ट्रवादी , मनसे या पक्षातील अनेक विद्यमान नगरसेवकांनी भाजपचा रस्ता धरला. मनसेचे शहरातील मातब्बर नेते रवींद्र धंगेकर हे देखील भाजपच्या दारावर धडकले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारीचे आश्वासन देखील दिलं. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिल्यानं धंगेकर निश्चित होते. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांनी धंगेकर यांची भाजप मध्ये डाळ काही शिजू दिली नाही. धंगेकरांना भाजप ने उमेदवारी दिली तर, मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशाराच बापट यांनी दिल्याची चर्चा आहे. परिणामी धंगेकर यांना काँग्रेसच्या हाताचा आधार घ्यावा लागला.
इतर पक्षातून आलेले मात्र , उमेदवारीची खात्री नसलेले धंगेकर एकटेच नाहीत. राष्ट्रवादीतून भाजप मध्ये आलेले बापूराव कर्णे गुरुजी यांची देखील अशीच अवस्था झालीय. कर्णे गुरुजीं यांना बापट यांचा थेट विरोध नसला तरी एका भाजप आमदाराचा विरोध आहे. पण त्यामागेही बापट यांचीच फूस असल्याचं बोललं जातंय. कधी स्वतः. कधी स्थानिक आमदार तर कधी पक्षातील पदाधिकारी यांच्या मार्फत इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना बापट विरोध करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळं बापट यांना खरच पुण्यात भाजपची सत्ता आणायची आहे का, यावर शंका घेतली जात आहे. भाजप मधून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.
पुण्यात भाजप मध्ये प्रवेश केलेले इतर पक्षातील उमेदवार हे प्रामुख्यानं खासदार संजय काकडे यांच्या मार्फत आलेले आहेत. तर, काही बापट यांच्या पक्षांतर्गत विरोधांमार्फत आलेत. त्यामुळं, त्यांना येनकेन प्रकारे विरोध केला जात असल्याचं भाजप मधील लोकच बोलत आहेत. पण, यात इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांचे राजकीय करिअर मात्र पणाला लागणार आहे. त्यामुळं धंगेकर हि भाजप मध्ये प्रवेश केलेल्यांसाठी आणि करू इच्छिणाऱ्यांसाठी लिटमस टेस्ट ठरावी...