नागपूर : प्रेमात आंधळे झालेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाने विषप्रयोग करून संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन प्रेमियुगुलाला पोलिसांनी अटक करून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील या अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. दोन महिन्यांपूर्वी दोघेही पळून गेले होते, त्यावेळी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक करून त्याची रवानगी बालसुधार गृहात केली होती.
काही दिवसापूर्वी तो जामीनावर सुटल्यानंतर दोघांच्याही भेटीगाठी पुन्हा सुरु झाल्या. मात्र मुलीच्या कुटुंबियांच्या विरोध संपवण्यासाठी त्यांनी मुलीच्या कुटुंबियांनाच संपविण्याचा कट आखला.
आरोपी प्रियकराने मुलीला उंदीर मारण्याचं औषध दिलं. रात्रीच्या जेवणात मुलीनं ते औषध टाकलं. तर घराच्या छतावर झोपलेल्या प्रेयसीच्या वडिलांवर प्रियकरानं धारदार शस्त्रानं वार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या वडिलांनी आरडा ओरड केल्याने घरातील इतर मंडळींनी येऊन प्रियकराला पकडलं आणि सारा प्रकार उघड झाला.