मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे मराठी भाषा समृद्ध - CM

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2017, 11:46 PM IST
मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे  मराठी भाषा समृद्ध - CM title=
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपप्रज्वलन करुन संमेलनाचे उद्धघाटन केले. यावेळी मान्यवर साहित्यिक.

डोंबिवली : 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मराठी सारस्वतांचा हा सोहळा सुरू झाला. अशी संमेलनामुळे  मराठी भाषा समृद्ध होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलंय. अनेक साहित्य प्रेमी, वाचक, लेखक मंडळींसह संमेलनाला 11 ते 12 हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

उद्घाटन सोहळ्यास संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, महापौर राजेंद्र देवळेकर, प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे, समीक्षक डॉ. म. सु. पाटील उपस्थित होते.

९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली डोंबिवलीत सुरू झाले असून ते ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आहे.

आपल्या उद्घाटनपर भाषणात सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोग आणि आचारसंहितेवर भाष्य केले. आयोगाने आपल्याला परवानगी दिली नसती, तर निवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करावे लागले असते, असे ते विनोदाने म्हणाले.

साहित्य संमेलनांसारख्या व्यासपीठांमुळे मराठी भाषा समृद्ध होत असल्याचं सांगतानाच मराठी शाळा वाचवायच्या असतील तर 21व्या शतकातलं तंत्रज्ञान आणलं पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं.