मुलाला वाचवण्यासाठी 'ती'नं बिबट्यावर चढवला प्रतिहल्ला

आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एक आईच मृत्यूचा सामना करू शकते... याचाच प्रत्यय आलाय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात...

Updated: Oct 10, 2015, 12:31 PM IST
मुलाला वाचवण्यासाठी 'ती'नं बिबट्यावर चढवला प्रतिहल्ला title=

संगमनेर : आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एक आईच मृत्यूचा सामना करू शकते... याचाच प्रत्यय आलाय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात...

रुपाली भाऊसाहेब खताळ असं या मातेचं नाव आहे. धानंदरफळ या गावातील खताळ दांम्पत्य आपल्या दीड वर्षांच्या चिमुकल्यासह रात्री साडे आठच्या सुमारास मोटार सायकलवरून जात असताना एका बिबट्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. संगमनेर - अकोले रोडवर कोकणेवाडीजवळ ही घटना घडली.

बिबट्याच्या हल्ल्यानं भेदरलेली रुपाली आपल्या चिमुकल्यासह मोटार सायकलवरून खाली पडली. बिबट्यानं तिच्या पायावर झडप घातली होती. त्याही स्थितीत आपल्या चिमुकल्याला पोटाशी कवटाळून रुपालीनं बिबट्याच्या जबड्यातून आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला. आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी रुपाली दुसऱ्या बाजुली वळली असताना बिबट्यानं पुन्हा तिच्या पाठीवर हल्ला केला. पण, अंगावर असलेल्या जाडसर स्वेटरमुळे रुपाली वाचली.

रुपाली बिबट्यासोबत दोन हात करत असतानाच एक गाडी पाठिमागून आली... गाडीत असलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला... आणि बिबट्याला पळवून लावलं.

आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या चिमुकल्याचा वाचवणाऱ्या या माऊली वर संगमनेरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, याच गावात काही दिवसांपूर्वी बिबट्यानं एका पाच वर्षांच्या मुलीला आपलं भक्ष्य बनवलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.