कल्याण डोंबिवली पालिका आवारात हॉकीस्टिक, स्टम्प कशासाठी?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शनिवारी सर्वसाधारण सभा सुरु असताना पालिका आवारात झालेल्या राडा प्रकरणी, पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 27, 2017, 12:17 PM IST
कल्याण डोंबिवली पालिका आवारात हॉकीस्टिक, स्टम्प कशासाठी? title=

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेत शनिवारी सर्वसाधारण सभा सुरु असताना पालिका आवारात झालेल्या राडा प्रकरणी, पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे. पालिका आवारात भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. 

कल्याण डोंबिवली पालिका आवारात भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये शनिवारच्या हाणामारीच्या आधीही दोन वेळा वाद झाले होते. मात्र शनिवारी थेट हाणामारीच झाल्यानं पोलिसांनी लाठीमार करून दोन्ही गटाच्या समर्थकांना पांगवलं. 

तेवढ्यावरच न थांबता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पालिका मुख्यालयातल्या मोठ्या वाहनांची झडती घेतली. त्यात एका माजी नगरसेवकाच्या गाडीत मोठी बंदूक सापडली तर एका गाडीतून पोलिसांनी हॉकीस्टिक, स्टम्प, मिरची पूड जप्त केली. 

नगरसेवकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केलीय. तर नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. 

नुकतीच ड वरुन क दर्जा मिळालेली कल्याण डोंबिवली महापालिका असल्या दादा भाइंच्या झुंडशाहीमुळे ढ होईल की काय असा संताप कल्याण डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत.