जळगाव : व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर या शेतकऱ्याला नेटीझन्स सलाम ठोकतातय, पण व्हॉटस अॅपवर आलेली सर्वच माहिती खरी असतेच असं नाही, म्हणून आम्ही या शेतकऱ्याचा शोध घेतला, यावरून हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावचा असल्याचं स्पष्ट झालंय.
या शेतकऱ्याचं नाव विठोबा हरी मांडोळे असं आहे, त्यांनी तीन एकर कापसाचं शेत खाटीने आखलं, हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा झाला आहे, दुष्काळाचा शेतकऱ्यावरचा परिणाम यातून दिसून आला आहे.
विठोबा यांच्या नावावर गुंठाभरही जमीन नाही, हाफिज खाटीक यांची ३ एकर जमीन २५ हजार वार्षिक मोबदला देऊन ते कसतात, मात्र मागील वर्षी कसायला घेतलेल्या या जमिनीतून, विठोबांना २५ हजार तर निघालेच नाहीत, पण खत, बियाणे आणि इतर खर्च वाढले, त्यांना मोठा तोटा झाला.
आता बियाण्यांसाठीच कसाबसा पैसा आणला, मात्र बैलजोडीवाल्यालाच बैलांना महाग चारा देणे कठीण झाले आहे, त्यामुळे भाड्याने बैलजोडी आणायला पैसा नाही. बैलजोडी एका दिवसाला ७०० रूपये घेते.
विठोबा यांच्या शेताच्या बाजूला आश्रम शाळा आहे, तेथील शिक्षक म्हणतात, विठोबा शेतात दिवसा काय पण रात्रीही शेतात राबताना दिसतात, पण त्यांच्या हातात काहीच न आल्याने त्यांना बैल आणि औताचं काम एकट्यालाच करण्याची वेळ आली असावी, त्यांची पत्नी देखील शेतात रात्रंदिवस राबताना दिसते.