'एमआयएम'चं आणखी एक स्वप्न भंगलं...

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 25 जागा मिळवणारा एमआयएम पक्षाचं आणखी एक स्वप्न भंगलं. 

Updated: May 7, 2015, 09:20 PM IST
'एमआयएम'चं आणखी एक स्वप्न भंगलं... title=

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 25 जागा मिळवणारा एमआयएम पक्षाचं आणखी एक स्वप्न भंगलं. 

औरंगाबाद महापालिका निवडणुकांत भरघोस यश मिळवल्यानं एमआयएमलाही सत्तेचे वेध लागले होते. शिवसेना-भाजपच्या वादात सत्तेवर येण्यासाठी या पक्षानं मोर्चेबांधणी सुद्धा केली. मात्र, युती झाली आणि एमआयएमचं सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं. पण आता सत्ता गेली किमान विरोधी पक्ष नेतेपद तरी मिळावं म्हणून एमआयएमनं कंबर कसली. मात्र या ठिकाणीही नशीब साथ देताना दिसत नाहीय. 

एमआयएम पक्षाच्या नोंदणीकृत असण्यावरच काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. या पक्षाला निवडणुकांतही नोंदणीकृत नसल्यानं एकच निवडणूक चिन्ह मिळालं नाही. त्यामुळं हा पक्ष नाही तर अपक्षांचा गट असल्याचं काँग्रेसचं म्हणणंय. त्यामुळं काँग्रेसनं आपल्या 11 नगरसेवकांच्या जीवावर विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केलाय.

एमआयएम मात्र या सगळ्या प्रकाराची खिल्ली उडवताना दिसतेय. आमचा पक्ष नोंदणीकृत असून आमचाच दावा योग्य असल्याचं ते सांगतायत. आम्हाला महत्त्वाच्या पदापासून दूर ठेवण्यासाठी युतीच्या नेत्यांचाच हा कट असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. 

नोंदणीकृत की संख्याबळ यावरून आता पेच निर्माण झालाय. खुद्द निवडणूक विभागानं सुद्धा एमआयएमला मिळालेल्या जागा अन्य या प्रकारात दाखवल्या होत्या.. त्यामुळं एमआयएम खरंच राज्यात नोंदणीकृत आहे का? असा प्रश्न आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.