जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ज्यांनी केला अशा चुकीच्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी खड्यासारखे बाहेर काढलं, अशी बोचरी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न घेता मुक्ताईनगर इथं केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये गुलाबराव पाटलांची तोफ पुन्हा धडाडली. कोणतीही निवडणूक नसताना या सभेला सुमारे दहा हजार लोक जमल्याने मुक्ताईनगरमधील भविष्यातील राजकीय चित्र वेगळे राहणार, असं भाकीतही यावेळी गुलाबराव पाटील यांनी केलं.
खडसेंनी व्यक्ती द्वेषाचं राजकरण करत माजी मंत्री सुरेश जैन, माजी आमदार संतोष चौधरी तसेच आपल्यालाही त्रास दिला. त्यामुळे भीमाने बकासुराचा वध केला तसा चंद्रकांत पाटीलांनी मुक्ताईनगरमध्येही बकासुराचा वध करावा, असं विधानही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.