बीड : भाषणापूर्वी हजारो समर्थकांसह पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडेही होत्या. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आवर्जुन उपस्थित होते. पंकजा मुंडे गडावर जात असताना त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली. तसंच त्यांना रस्त्यातच भाषण करण्याची मागणी केली. मात्र पंकजा गाडीतून खाली उतरल्या आणि थेट भगवानबाबांचं दर्शन घ्यायला गेल्या.
दर्शन घेतल्यानंतर नामदेव शास्त्रींची भेट न घेताच त्या गडावर खाली आल्या. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्यामुळे थोडासा गोंधळ उडाला. तर काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना थोडासा बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान आज भगवानगडावर पंकजा समर्थकांनी केलेल्या अभूतपूर्व गर्दीच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच भगवान बाबांच्या दर्शनावर निर्बंध घालावे लागले. गेल्या काही दिवसात भगवानगडावर उफाळून आलेल्या वादाचा परिणाम म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होतीच. त्यासाठी काल संध्याकाळपासून गडाला छावणीचं रुप आलं होतं. पण प्रत्यक्ष पंकजा मुंडे त्यांच्या समर्थकांसह दाखल झाल्यावर मात्र परिस्थिती आणखी चिघळली असती...म्हणून काही वेळासाठी सामान्यांसाठी दर्शन थांबवण्यात आलं.