मुख्यमंत्र्यांनी काही तासांत मंजुर केली नियमबाह्य कामांची फाईल!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फायली पेंडिंग ठेवतात, असा आरोप शरद पवार यांनी नुकताच केला. त्यावरून राज्यात फाईल वॉर चांगलेच गाजले... मात्र एक फाईल अशी आहे, जिच्यावर पृथ्वीबाबांनी एका दिवसातच मंजुरीचा कोंबडा काढला...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 16, 2013, 06:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फायली पेंडिंग ठेवतात, असा आरोप शरद पवार यांनी नुकताच केला. त्यावरून राज्यात फाईल वॉर चांगलेच गाजले... मात्र एक फाईल अशी आहे, जिच्यावर पृथ्वीबाबांनी एका दिवसातच मंजुरीचा कोंबडा काढला... महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीबाबांनी अवघ्या काही तासात मंजूर केलेल्या या फाईलमध्ये नियम धाब्यावर बसवून बदल्या करण्यात आल्यायत...
मुख्यमंत्र्यांनी पुणे विभागातल्या तब्बल 53 उप-जिल्हाधिका-यांच्या बदलीचा आदेश काढला ८ ऑगस्ट रोजी. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी एक दिवस आधीच, म्हणजे ७ ऑगस्टला ही फाईल सादर केली आणि दुस-याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिलीसुद्धा. या फाईलचा प्रवास फक्त पुण्याचे विभागीय आयुक्त ते मुख्यमंत्री असा झालेला नाही. तर, पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडून बदल्यांची ही फाईल आधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेली. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली. तिथेही या फाईलला लगेचच हिरवा कंदील मिळाला. आणि हे सर्व घडलंय ते फक्त एका दिवसात. मुख्यमंत्री झाल्यापासून पृथ्वीराज चव्हाणांनी एका दिवसात फाईल मंजूर करण्याचं हे कदाचित पहिलंच उदाहरण असावं.

फाईल मंजूर करताना २००५च्या अधिनियमानुसार या बदल्या करण्यात येत असल्याचं आदेशात स्पष्टपणे म्हटलंय. मात्र, अशा बदल्या करायच्या झाल्यास त्या ३१ मे पर्यंतच कराव्यात, त्यानंतर अशा घाऊक बदल्या करता येणार नाहीत, असं हाच २००५ चा अधिनियम सांगतो. प्रत्यक्षात बदल्या झाल्या आहेत त्या थेट ऑगस्ट महिन्यात.... मग नियम डावलून आणि तेही दोन महिने उशिरा बदल्या करण्या मागचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित होतो...
विशेष म्हणजे बदल्या करताना काही ठराविक उप-जिल्हाधिका-यांना मात्र वगळण्यात आलंय. पृथ्वीबाबांच्या कराडचे प्रांत अधिकारी म्हणून संजय तेली यांची तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांची बदली करणे तर राहिले दूर, उलट त्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आलीय. पूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे स्वीय सहायक असलेले विद्युत वरखेडकर यांची चार वर्षे झाली तरी पुण्याचे भूसंपादन उप जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली नाही.
प्रत्यक्षात अपवाद ठरलेले असे २० हून अधिक अधिकारी आहेत. याहूनही विशेष म्हणजे बदल्यांची फाईल ज्या प्रभाकर देशमुख यांनी दिली, त्यांना तर पुणे शहरात तब्बल दहा वर्षं झाली आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी, त्यानंतर कृषी आयुक्त आणि आता पुण्याचे विभागीय आयुक्त... अशी सलग दहा वर्ष प्रभाकर देशमुख पुण्यात ठाण मांडून आहेत.
एकूणच बदल्यांची ही फाईल म्हणजे मोठं गौडबंगाल आहे. एवढ्या संदिग्ध फाईलवर मुख्यमंत्र्यांनी एकाच दिवसात सही केली कशी? हा त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न आहे....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.