www.24taas.com , झी मीडिया, सांगली
सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ आणि तासगांव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.
बैलांच्या शेपट्या चावून रक्तबंबाळ करण्यात आल्या, तसंच नाकात तारा घुसवण्यात आल्या. बैलगाडीला लावण्यात आलेले खिळे बैलांच्या मानेभोवती टोचवण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळं बैलांना गंभीर जखमा झाल्यात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाड्यांच्या शर्यती भरवण्यात आल्या होत्या.
कुकटोळी गावातल्या शर्यत घेणाऱ्या आयोजकांवर कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सावळजमधल्याही आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. मुंबईतले प्राणीमित्र अजय मराठेंच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलीय.
ग्रामीण भागात वर्षानुवर्ष बैलगाड्यांच्या शर्यती भरवल्या जातात. गेल्या काही वर्षांत कोर्टाच्या आदेशांमुळं अशा स्पर्धांवर बंदी आली होती आता ही बंदी उठवण्यात आलीय. मात्र शर्यती घ्यायला परवानगी देताना कोर्टानं आयोजकांना अटी आणि शर्ती आखून दिल्यायत. मात्र सांगलीत असे कुठलेही आदेश पाळल्याचं दिसून आलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.