लातूर : निलंग्याहून मुंबईला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालाय. परंतु, सुदैवानं हेलिपॅडवरच हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.
या अपघातात मुख्यमंत्र्यांच्या हाताला थोडं खरचलं असलं तरी ते सुखरुप आहेत. याच अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आपण सुखरूप असल्याचं सांगितलंय.
'निलंग्यावरून आमचं हेलिकॉप्टर उडालं... परंतु, तेव्हाच या विमानाला अपघात झाला... परंतु, मी आणि माझी टीम सुखरुप आहे' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनतेला दिलासा दिलाय.
'महाराष्ट्राच्या ११ कोटी २० लाख लोकांच्या आशिर्वादानं जनतेचा आशिर्वाद पाठिशी आहे... आई भवानी आणि विठ्ठलाचा हात पाठिशी जनतेनं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये... महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुखरुप आहे... आपला आशिर्वाद असाच पाठिशी असू द्यावा... कुणीही काळजी करण्याचं कारण नाही... आपल्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय...' असं मुख्यमंत्र्यांनी 'झी २४ तास'शी बोलताना म्हटलंय.
याशिवाय 'अपघातग्रस्त हेलिकॉप्टर जुनं नव्हतं... तर ते नवीन हेलिकॉप्टर होतं... आमचे मीडिया अॅडव्हायजर केतन पाठक यांना थोडं लागलंय... पण, तेही आता सुखरुप आहेत... आपले पुढचे सगळे कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होतील' असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलाय.