लातूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातुरात उड्डाण घेत असताना अपघात झाला. मुख्यमंत्र्यांचं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. या अपघातात मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला खरचटलं आहे.
हेलिकॉप्टरचे पंख जागीच निखळले आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून मोठा धूर निघतोय. जवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपण आणि आपली टीम सुरक्षित असल्याचं ट्ववीट केलं आहे. जवळचं १०० मीटरवर एक ट्रान्सफॉर्मर देखील आहे.
गडचिरोली येथे देखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर बंद पडलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे हेलिकॉप्टर २२ वर्षे जुने होतं. त्याहून धक्कादायक म्हणजे हे हेलिकॉप्टर मूळ उत्तर प्रदेश सरकारचे असून त्याची त्यांनी अलीकडेच विक्री केली गेली होती. पण आज अपघात झालेलं हेलिकॉप्टर हे नवीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नवीन असून ही मुख्यमंत्र्यांच्या या हेसिकॉप्टरला अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांना तिसऱ्यांदा फटका
राज्य सरकारकडे अद्ययावत हवाई वाहन नसल्याने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याआधी दोन वेळा आणि आज तिसऱ्यांदा फटका बसला आहे. याआधी १० जुलै २०१६ ला भर पावसांत उतरू न शकल्याने मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या आकाशातूनच परत जावे लागले होते. त्यावेळी खराब हवामानापेक्षा राज्य सरकारकडे असलेले सेसना कंपनीचे विमान जुन्या तंत्रज्ञानाचे असल्याचा फटका बसला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा तब्बल २२ वर्षे जुन्या हेलिकॉप्टरचे एक इंजिनच ऐनवेळी सुरू न झाल्याने मुख्यमंत्र्यांना उतरावे लागले.
मुख्यमंत्र्यांच्या ज्या हेलिकॉप्टरला आज अपघात झाला ते हेलिकॉप्टर व्हीटी-सीएमएम या नावाचं आहे. हे महाराष्ट्र सरकारचंच हेलिकॉप्टर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण याबाबत सविस्तर माहिती अजून मिळालेली नाही.