'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'

मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल... पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागलीय. कारण, पहिली गाडी येऊन विहिरीत पाणी भरायला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली.

Updated: Apr 12, 2016, 04:45 PM IST
'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी' title=

लातूर : मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल... पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागलीय. कारण, पहिली गाडी येऊन विहिरीत पाणी भरायला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली.

ही दृष्य आहेत लातूरमधली... मिरजेहून पाण्यानं भरलेले १० रेल्वे टँकर्स आल्यानंतर त्यावर अशी पोस्टरबाजी करण्यात आली. लातूर शहराची तीव्र पाणीटंचाई ओळखून फडणवीस सरकारनं रेल्वेवाटे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतल्यानं तो तातडीनं अमलातही आला. मात्र, त्यावरून आता असं राजकारण सुरू झालंय.

लातूर भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर काही पोस्टर झळकवून जोरदार घोषणाबाजी केली.  

काँग्रेसनं या श्रेय्यवादाच्या लढाईत आणखी पुढचं पाऊल टाकलंय... मुळातच दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रेल्वे लातूरला आणली, म्हणून हे पाणी आणणं शक्य झालं, असं काँग्रेसनचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख म्हणतायत. 

आता, 'जलराणी'चं श्रेय्य लाटत असताना इथे दुष्काळ आहे आणि त्यामुळे रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आलीय, हेच भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक नेते विसरलेत. एक बरं आहे... 'जेम्स वॅट'नं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, म्हणून रेल्वेनं पाणी लातूरला येऊ शकलं, असं अजून कोणी म्हणालं नाहीय... हीच काय ती समाधानाची बाब...